...जेव्हा अश्रु बोलु लागतात.
एक गरीब मुलगा रोज कॉलेजला जात असे. घरापासुन कॉलेजचं अंतर १५ किलोमीटर होतं. परिस्थिती जेमतेम असल्यामुळे बसचा प्रवासच भाळी लिहिलेला होता. रस्त्यावर धावणारी बस माणसाला खुप काही देते. प्रेम देते, स्वप्न देते, ध्येय देते, यशही देते आणि यश मिळविण्यासाठी लागणारी उर्जाही देते. या बसमध्ये अनेक प्रेमाची नाती रुजली जातात, भिजली जातात आणि फुललीही जातात. काही शेवटास जात नाहीत याची एक मुक साक्षीदारही ही बस असते. अनेक वचनांची ती जणु मुक साक्षीदारच असते. अनेक पुर्ण न झालेल्या शपथांना तिच्या त्या अविरतपणे खडखडणार्या खिडक्यांनी ऐकलेलं असतं. तिला पाहिल्यावर आजही माझा तर काळजाचा ठोकाच चुकुन धाप लागते. श्वास वेगवान होतो आणि क्षणात 'कोरोना' झाल्याचा साक्षात्कार होतो. पण तो 'कोरोना' नसतो तर जुन्या आठवणींने श्वासनलिकेत अडकलेला श्वास असतो. जणु आपला प्राणच असतो. प्रेमाबरोबर ही बस ध्येयाची आणि यशाची 'कंडक्टर' अर्थात 'वाहक' असते. असो. असाच एक गवंड्याचा मुलगा कॉलेज करत होता. कधी काही कामानिमित्त पुण्यालाही बसनेच जायचा. नगरच्या बसस्थानकावर उतरायचा. बसस्थानकात उतरल्यानंतर त्याची नजर बसस्थानकामधील भिंतींवर चिकटविलेल्या सिनेमाच्या पोस्टरवर पडायची. हा मनात विचार करायचा 'आपलंही कधी असं पोस्टर चिकटेल का?' या विचारात तो हरखुन जात असे. त्या तंद्रीत वडिलांची हलाखीची परिस्थिती त्याला जागं करत असे. मग हा पुढचा रस्ता पकडत असे. कलेच्या वेडाने झपाटलेला हा एक गरीब घरातील मुलगा होता. वडिल गवंडी काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. अभ्यासात जेमतेमच होता. सातवीपर्यंत प्राथमिक शाळेत शिकला. गाव पाच - सहा हजार लोकवस्तीचं होतं. जास्त लोक अशिक्षित होते. अशा गावात हा उनाडक्या करत असे. 

लोक याच्या वडिलांना सांगत की, मुलाकडं लक्ष द्या. त्याला चांगलं शिकवा. पण वडिलांचा आपल्या मुलावर भारी विश्वास होता. आपला मुलगा जगावेगळा आहे हे त्या बापाला माहित होत. सिमेंट कामात रक्त आटवत संसाराचा गाडा हाकणार्या एका गरीब कष्टकर्याच्या कुटुंबात याचा जन्म झाला होता. पण एक दिवस मोठा रुपेरी पडदा व्यापुन टाकायचं स्वप्न या पठठ्यानं उराशी बाळगलं होत. बाप गवंडी आणि मुलाला रुपेरी पडद्याचे अशक्यप्राय स्वप्न पडु लागले. त्या स्वप्नांना सत्याच्या दिशेने उतरवायचे प्रयत्न या ध्येयवेड्याने सुरु केले. पण रस्ता सापडतं नव्हता. तो हरला नाही, बधला नाही आणि माघारी फिरणं तर त्याच्या रक्तातच नव्हतं. आणि त्याचे प्रयत्न सफल झाले, कार्य सिध्दीस गेले. त्याला 'प्रेमवारी' सिनेमा मिळाला. या सिनेमातील 'राजा' च्या भुमिकेला त्याने न्याय दिला. हाच ११ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रातील सर्वसाधारण युवक 'प्रेमवारी' चित्रपटातला 'राजा' बनुन प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत बनला आणि कधी 'फक्त मराठी', कधी अन्य चॅनेलवरून लोकांच्या भेटीला येऊ लागला. त्याचं नाव आहे राजेश ननवरे. या 'प्रेमवारी' चित्रपटातील राजेश ननवरे यांचं मुळं गाव अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात निमगाव गांगर्डा हे आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं. पुढील शिक्षणासाठी त्यांना आष्टी तालुक्यातील कडा या मोठ्या शहरवजा गावचा पकडावा लागला. कला तर अंगात ठासुन भरलेली होती. पण त्या कलेला शाळा कॉलेजमधील स्टेज सोडुन दुसरं कुठं व्यासपीठ मिळत नव्हतं. कधी हा नगरला आला तर जाताना माळीवाडा बसस्थानकांवर झळकणारे मोठ्या मोठ्या सिनेनटांचे बॅनर याच्यातल्या कलाकाराला ललकारत असत. ते जणु म्हणत असत की एक दिवस तुझी जागाही ईथेच आहे. पण स्वप्न ते स्वप्नच असतं या विचाराने हा पुढे चालु लागे. लहाणपणी छोट्या मोठ्या नाटकांत काम करण्याची संधी मिळाली होती. 

आता हा सिनेमात कुठेतरी काम मिळेल यासाठी भटकंती करु लागला. अॉडिशन्स दिल्या पण यश आले नाही. कुठल्या तरी सिनेमात काम मिळेल या आशेने मुंबई- पुण्याच्या वार्या केल्या. आर्थिक विवंचनेत अडकला. कधी - कधी पैशाअभावी उपाशी राहिला. बसस्थानकांवर, रेल्वेस्टेशनवर वर्तमानपत्रांची कागदं अंथरुन झोपला आणि एक दिवस सोन्याचा उगविला. नगरच्या दादासाहेब जगताप यांच्या 'आनंदमहिमा' या मालिकेत काम करण्याची संधी राजेश ननवरे यांना भेटली. त्या मालिकेनंतर 'ठाकराचा तुक्या' ची कास्टिंग सुरु होती. त्यात यांची निवड झाली. त्याला पहिलाच 'ठाकराचा तुक्या' नावाचा सिनेमा मिळाला. यशाची जणु गचांडी पकडुन त्यानं आपल्याकडे खेचुन आणलं होतं. आता रस्ता सापडला होता. ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण सुरुच होते. आणि अशातच त्याला राजेंद्र गायकवाड दिग्दर्शित 'प्रेमवारी' या मोठ्या बजेटच्या सिनेमामध्ये सहायक अभिनेत्याची भुमिका मिळाली. त्या भुमिकेचं त्यानं सोनं केलं. अत्यंत आशयघन आणि सामाजिक संदेश देणारा चित्रपट करण्याची संधी त्याला मिळाली होती. अत्यंत सुंदर अशी प्रेमकथा 'प्रेमवारी' च्या निमित्ताने प्रेक्षकांपुढे आली आणि प्रेक्षकांना त्यातील राहुल आणि राजा प्रचंड भावला. तो 'राजा' म्हणजेच अभिनेते राजेश ननवरे होय. 

सिनेमा पुर्ण भावनाप्रधान होता. सिनेमाचा शेवट पाहिल्यानंतर डोळ्यातुन अश्रु वाहणे थांबतच नाही. सिनेमाचा नायक अत्यंत गरीब परिस्थितीत आणि झोपडीत राहणारा मुलगा असतो.  एका आमदाराच्या मुलीचा त्याच्यावर जीव जडतो. प्रतिष्ठेचा, समाज आणि मानमर्यादांचा प्रश्न उभा ठाकतो. तो मुलगाही तिच्यावर जीव टाकत असतो. तिची आठवण त्याच्या काळजात  चाकुप्रमाणे घुसुन राहते. अंत वाईट होतो. असा हा सिनेमा आणि त्यातील महत्वाच्या भुमिकेत राजेश ननवरे यांनी जीव ओतलाय. मुख्य भुमिका चिन्मय उदगीरकर या प्रतिभासंपन्न कलाकाराने जिवंत केली. ज्यावेळी सिनेमा चालु असतो त्यावेळी अक्षरक्षः पडदा बोलु लागतो आणि पदड्यावरील ती विषन्न करणारी परिस्थिती पाहिल्यानंतर आपण मात्र अबोल होतो आणि अश्रु बोलु लागतात. सध्या 'प्रेमवारी' हा सिनेमा ओटीटी प्लॉटफॉर्मवरील एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित करण्यात आला आहे आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळतोय. 

लेखक- दत्ता पवार (मो- ९६५७६०८३३२)
(लेखक हे पत्रकार आणि सामाजिक अभ्यासक आहेत)
header ads