खरं तर आज चांदबीबी चा महल (सलाबत खानाची कबर) पहायची इछा होती पण आईच्या म्हणण्यानुसार आम्हाला नगरच्या जवळच असलेल्या गोरक्षनाथ गडावर जावं लागलं अर्थात गोरक्षनाथ गड म्हणजे कुठला किल्ला नव्हे तर हे एक नवनाथ पंथातील गोरक्षनाथ यांचं जागृत देवस्थान असून एक निसर्गरम्य ठिकाण आहे.




तिथं दर्शन घेऊन आम्ही गोरक्षनाथ गडाचा घाट उतरत असताना समोरचा मांजरसुंबा किल्ला त्याचं राहिलेलं अस्तित्व जाणवून देत होता.  मग मनातच बेत ठरला की आज या किल्ल्याला भेट द्यायचीच. वडिलांच्याकडे हळूच वशिला लावून परवानगी मिळवली आणि मांजरसुंबा गावाच्या स्मशानभूमी जवळून डावीकडे वळणाऱ्या रस्त्याने गाडी वळवली. कच्या दगडी रस्त्याने जात असताना आज आई, वडील,पत्नी आणि मी असा सहपरिवार ट्रेक करतोयत याचा मनातल्या मनात आनंद होत होता. दरवेळेस ट्रेकला गेल्यावर किंवा जाऊन आल्यावर घरच्यांची बोलनी ऐकावी लागतात की काय मिळतं कुणास ठाऊक दगडा धोंड्यात फिरून. आज हे त्यांनाही अनुभवायला मिळणार होत. वळणं घेत गाडी पायथ्याशी असलेल्या बुरुजाजवळ पोहचली. बुरुज फक्त नावाला शिल्लक राहिला होता बाकीची तटबंदी केव्हाच जमीनदोस्त झाली होती, बहुदा तेथील दगडही स्थानिकांनी लांपास केले असावेत. बुरुजावर एका छोट्याशा मंदिरात बजरंगबली विराजमान होते, आम्ही हात जोडून पुढे मार्गक्रमण सुरू केले. 


वाटेत एक वाळलेल्या अवस्थेत असलेलं पण वरती हिरवी पालवी असलेलं झाड दिसलं. आम्ही जणू आश्चर्यचकित झालो की खोडावर सालही नाही अन खोड तर संपूर्ण वाळलेल आहे मग हे झाड हिरवं कसं ? हा प्रश्न पडला. जस जसे झाडाच्या जवळ पोहोचलो तेव्हा समजलं की कडुलिंबाच्या झाडावर पिंपरीच्या झाडाने अतिक्रमण करून त्याने तिथे स्वतःच अस्तित्व निर्माण केलंय. पिंपरीच्या झाडाच्या मुळ्यांनी कडुनिंबाच्या वाळलेल्या खोडातून मार्ग काढत थेट जमिनीत प्रवेश केला होता. 

किल्ल्यावर जाण्यासाठी मांजरसुंबा ग्रामपंचायतीने खोदकाम करून घाट वजा रस्ता बनवलेला आहे.किल्ला तसा फार अवघड वगैरे नसल्याने आम्ही १५ ते २० मिनिटात किल्ल्याच्या पश्चिमेस असलेल्या दरवाज्यात पोहचलो.मुख्य दरवाजा अन त्याच्या दोन्ही बाजूला पहारेकर्यांसाठी दोन मोठ्या देवड्या अतिशय सुंदर अश्यापध्दतीने उभारल्या आहेत. दरवाज्याची रचना देखील अप्रतिम आहे, सध्या दरवाजाची कवाडे अस्तित्वात नाही आहेत पण जर आपण ती रचना आणि आतील बाजूस असलेली दरवाज्या बंद करण्याची योजना पहिली तर तो दरवाजा किती भक्कम असावा याचा प्रत्यय येतो. 

दरवाजातून आत प्रवेश केल्यावर ३ खोल्यांची रचना पाहायला मिळते, त्यात पहारेकरी राहत असावेत. इमारतीच्या वरच्या भागात सुंदर अशी नक्षीदार रचना केलेली आढळते. आजूबाजूला लक्ष ठेवण्यासाठी खिडक्याची मांडणी केलेली आहे, उजव्या बाजूस असलेल्या खोलीतून वरती जाण्यासाठी जिना बनवलेला आहे. या इमारतीवरून मांजरसुंबा गाव आणि आसपासच्या परिसरावर नजर ठेवत असत.

निजामशाही स्थापत्याची छाप या किल्ल्यावरील प्रत्येक इमारतीच्या रचनेत दिसून येते. १४ व्या शतकात निजामशहाच्या राजवटीत या किल्ल्याची बांधणी झाली आहे .  बहामनी फौजांनी मलीक अहमदवर आक्रमण केले होते तेव्हा अहमदशहाने इनामपुरच्या घाटात त्याचा दारूण पराभव केला आणि त्यानंतर त्याने १४९० साली अहमदनगर शहर वसवले आणि याच अहमदनगर शहराला आपल्या साम्राज्याची राजधानी बनवले. राजधानीच्या संरक्षणासाठी आजूबाजूच्या डोंगरावर किल्ले किंवा टेहळणी बुरुज बांधून राज्याच्या आणि राजधानीच्या संरक्षणात भर घालावी म्हणून हा किल्ला बांधला होता.


मुख्य दरवाज्यातून पुढे गेल्यावर समोरच महाल किंवा वाड्याचे अवशेष दिसायला लागतात. कुणी विचित्र प्रवृत्तीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाने ही ऐतिहासिक वास्तू विचित्र पद्धतीने रंगवून विद्रुप करून ठेवली आहे. रंगवलेल्या पायऱ्या चढून वर गेल्यावर उजवीकडे विस्तिर्ण असा भक्कमपणे बांधलेला मोठा तलाव किंवा हौद नजरेस पडतो, हा हौद पाणी साठवण्याची बांधलेला असावा. या भागात फार अशी पर्जन्यवृष्टि होत नसल्याने पावसाळ्यात या तलावात पाणी साठवून ते इतर ऋतूत वापरात आणत असावेत.

या तलावात उरतण्यासाठी दोन बाजुंनी पायऱ्या बांधलेल्या आहेत. याची उंची साधारणपणे ६ ते ७ फूट असची. हे संपूर्ण बांधकाम चुन्याचा वापर करून बांधलेलं आहे. 

या तलावा समोर असलेला अतिशय भव्यदिव्य असा  महाल किंवा वाडा आपलं लक्ष वेधून घेतो. एकंदरीतच या पूर्ण किल्ल्याच्या बांधणीत चुन्याचा वापर प्रामुख्याने केलेला दिसतो. आजही महल किंवा वाडा सोडुन इतर सगळ्या इमारती सुस्थितीत असलेल्या दिसतात. 

महाल किंवा वाड्याची इमारत ही ३ मजल्याची असून या इमारतीत साधारणपणे 10 ते 15 वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्यांची रचना असावी असं राहिलेल्या अवशेषांतुन अंदाज येतो, अतिशय सुंदर आणि रचनात्मक बांधकाम आणि भक्कमता ही निजामशाही बांधकाम शैलीची वैशिष्ट्य आहेत असं म्हंटलं तर वावग ठरणार नाही.डोंगराच्या कड्याच्या बाजून ही इमारत बांधताना हवेचा प्रवाह खेळतां राहून इमारतीच्या आतील भागात थंडावा राहावं ही त्यामागील एक उद्देश असावा.
याच इमारतीच्या बाजूला एक छोटेखानी इमारत आहे जी बहुदा कचेरी किंवा दरबार म्हणून वापरत असावेत, या इमारतीत लाल रंगाच्या फारश्या बसवलेला आहेत त्या आजही सुस्थितीत आहेत. गुप्त धनाच्या लालसेपोटी लोकांनी यातील काही फारश्या काढून तेथे खनन केल्याच्या खुणा दिसतात. 

महालाच्या पश्चिमेला स्नानगृह आणि पुरातन  शौचालय  बांधलेलं आढळते, काहीशी झालेली पडझड वगळता ही इमारत सुध्दा सुस्थितीत आहे.  यामध्ये ३ खोल्या आहेत आणि स्नानगृह आणि शौचालय अशी रचना आहे. 

त्यापुढे असलेल्या मोकळ्या जागेवर बगीचा असावा असा अंदाज आहे कारण डाव्या बाजूला मुख्य दरवाज्याकडे जाण्यासाठी तिथे पायऱ्यांची व्यवस्था आढळते. 

महालाच्या एका खोलीत दावल मलीक यांचा दर्गा असल्याचं स्थानिक गुरख्याने सांगितले. महालाच्या पुढील भागात लहान आणि मोठया आकाराचा अष्टकोणी हौद पाहायला मिळतो, इमारतीच्या सौंदर्यात भर घालण्यात  या दोन्ही हौदानी थोडा हातभार लावलेला आहे. 

आता आपण इमारतीच्या समोरच्या भागात आहोत जेथून दूर दूर वर पसरलेला वांबोरी गाव आणि राहुरी व नेवासे तालुक्यातील सपाट भाग दृष्टीक्षेपात भरतो. हा किल्ला बांधणीचा मुख्य उद्देश म्हणजे शत्रूच्या आक्रमनापासून संरक्षण मिळवणे हाच असावा याला दुजोरा मिळतो. 


उजवीकडे आपल्याला एक इमारत उभी दिसते ती अर्धी कड्यात आणि अर्धी जमिनीवर अशी बांधलेली आहे या इमारतीच वैशिष्ट्य म्हणजे या इमारतीच्या खालील भागांत पाण्याची ५ मोठी टाकी आहेत आणि त्यातून मोटेने पाणी उपसा करून महालाजवळील तलाव भरत असत. स्थानिक लोक त्याला हत्ती मोटेची विहीर असेही म्हणतात, ही इमारत सरळसोट बांधलेली असून त्यात खोल्यांची रचना केलेली दिसते. या इमारतीत २ मजले असून खालच्या माजल्यात जायला २ चौरस फुटचीच जागा आहे आत उतरण्यासाठी त्यात दगडी पायऱ्या ठेवलेल्या दिसतात. खालच्या माजल्याच प्रयोजन काय होत हे कळलं नाही पण अंदाजे मोटेला काही अडथळा येऊ नये अथवा आल्यास अडथळा दूर करता यावा अस काही असावं.

या इमारतीच्या पूर्वेला एक बुरुज दिसतो त्यातच अजून एक दरवाजा लपलेला आहे तो मात्र जवळ गेल्यावर दिसतो. त्या दरवाज्याने बाहेर जाण्यासाठी दगडी पायऱ्यांची सोय केलेली दिसते.  या वाटेने खालच्या बाजूला गेल्यास एक कातळात कोरून तयार केलेली पायवाट दिसते, तिचा माग घेतला तर ते आपल्याला मोट असलेल्या इमारतीच्या खाली घेऊन जाते. या इमारती खालच्या कातळात ५ पाण्याची कोरीव टाकी आहेत त्यातील एक मुख्य टाक आहे त्यातून मोटेने पाणी उचलत असत. सध्या पाण्याची टाकी शेवाळ आणि पान गवताने भरलेली आहेत तिथे संवर्धनाची गरज आहे. आत्ताच सरलेल्या पावसाळ्यातुन पाझरलेल्या पाण्याने ही सर्व टाकी ओसंडून वाहत आहेत. म्हणजे पाण्याची अतिशय उत्तम प्रकारे सोय केलेली पाहायला मिळते. 

हा डोंगराळ भाग गर्भगिरी पर्वत रांगेतील असल्याने या किल्ल्याच्या आवारात आणि आजूबाजूच्या परिसरात खुप खुप औषधी वनस्पती सापडतात त्यातील काही खूप दुर्मिळ आहेत म्हणून जाणीवपूर्वक मी नाव येथे लिहीत नाही.   


हे सर्व पाहून झाल्यावर आम्ही परतीच्या वाटेला लागलो. एकंदरीतच या किल्ल्याच्या इतिहासाचा कुठे उल्लेख सापडत नाहीय पण हा किल्ला खूप मोक्याच्या ठिकाणी असल्याने त्याचे निजामशाही राजवटीत महत्त्व असेलच हेही तितकंच खरं आहे.


कसे पोहचणार:- अहमदनगर येथून वांबोरी जाणारी बस मांजरसुंबा फाट्यावर सोडेल. तिथून 30 मिनिटे चालत किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचू शकता. 

नगर – औरंगाबाद हायवेवर अहमदनगर पासून 10 किमीवर वांबोरी फाटा आहे, या रस्त्याने सरळ 8 किमीवर मांजरसुंबा फाटा लागतो.



header ads